नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38,000 कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
कृषी मंत्री चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत असे सांगण्यात आले की, 2025 च्या खरीप हंगामात पेरणी अत्यंत समाधानकारक झाली आहे. भाताचे एकूण पेरणी क्षेत्र 441.58 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. तेलबियांखाली एकूण क्षेत्र 190.13 लाख हेक्टर नोंदवले गेले आहे, यामध्ये सोयाबीन आणि भुईमूग ही प्रमुख पिके आहेत. त्याचप्रमाणे, 120.41 लाख हेक्टरवर डाळींची पेरणी झाली आहे. डाळींचे जास्त उत्पादन घेणे हे पोषण सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच देशात ऊस क्षेत्र 59.07 लाख हेक्टर आहे; यामुळे ऊस उत्पादकांना थेट फायदा होत आहे.
यावर्षी अनुकूल आणि पुरेसा मौसमी पाऊस, तसेच जलाशयांमध्ये मुबलक पाणी साठवण झाल्यामुळे देशातील कृषी क्षेत्राला लक्षणीय फायदा झाला आहे. कृषी प्रगतीच्या साप्ताहिक आढावा दरम्यान, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नमूद केले की, बहुतेक प्रमुख जलाशयांचा जलस्तर सामान्य किंवा सामान्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सिंचनाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होतील आणि खरीप पिकांची वेळेवर पेरणी शक्य होणार आहे. मातीतील सातत्यपूर्ण ओलावा पिकांच्या वाढीस मदत करत आहे आणि रब्बी पेरणी क्षेत्रांमध्ये विस्तारास मदत करेल अशी अपेक्षा आहे.
देशभरातील कांदा, बटाटा आणि टोमॅटो पिकांची स्थिती समाधानकारक आहे आणि तांदूळ आणि गव्हाचा सध्याचा साठा ‘बफर’ मानकांपेक्षा जास्त आहे.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, वेळेवर आणि अनुकूल झालेला मोसमी पाऊस, पुरेसे भरलेले जलाशय स्त्रोत, कार्यक्षम नियोजन आणि डिजिटल नवोपक्रमांसह देशाचे कृषी क्षेत्र विक्रमी टप्पे गाठत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या शेतकरी-स्नेही धोरणांमुळे ही कामगिरी होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा मजबूत करत आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकार राज्यांशी समन्वय साधून, येत्या रब्बी हंगामात डाळी आणि तेलबियांच्या अधिक पेरणीला आणि विक्रमी उत्पादकतेला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.




















