सोलापूर – धाराशिव जिल्ह्याला जाताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बसस्थानकाची धावती भेट घेत परिसराची पाहणी केली. परिवहन मंत्र्यांनी तिसऱ्यांदा सोलापूर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी परिवहन मंत्र्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्याचे नूर बदलले.” कपाळावर आठ्या अन् चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू “जमा झाले.
सर्वत्र अस्वच्छता दुर्गंधी आणि कामातील दिरंगाई ढिलेपणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे यांना नोटीस बजावली. मात्र या कारवाईत बसस्थानक प्रमुख जाधव अधिकाऱ्यांच्या पाठीमागे दिसून आले. वास्तविक पाहता स्थानकाची जबाबदारी जाधव यांच्यावर असताना तोफेच्या तोंडी जुंदळे यांना दिल्याची चर्चा स्थानक परिसरात ऐकण्यास मिळाली.
“सकाळी साडेदहा वाजण्याची वेळ…अचानक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर बसस्थानकावर येणार असल्याची दवंडी मिळाली. लागोलाग अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. सार्वजनिक स्वच्छतागृह, कॅन्टीन, कर्मचाऱ्यांचे विश्रामगृह, प्रवाशांसाठीचे वाहनतळ, आदीं परिसरात लागलीच झाडून लोटून सारा परिसर चकाचक करण्यात आला. वरवरचे दिखावेपण परिवहन मंत्र्यांनी घेरले. त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सुनावले.
“मी येणार म्हणून पावडर टाकून स्वच्छता केली का? बस स्थानकाची काय अवस्था बनवली आहे. तुम्ही स्वतःचे घर समजून स्वच्छता करा. अशा दुर्गंधीत अस्वच्छ ठिकाणी पिण्याचे पाणी असून, तुम्ही स्वतःच येथे पाणी पिऊ शकता का? अशा प्रश्नांची सरबत्ती परिवहन मंत्र्यांनी सुरू केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू जमा झाले. अंगाचा थरका उडाला आणि तोंडातून चकार शब्द निघेना.”आठ दिवसांचा अल्टिमेट देऊन स्थानक परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचे आदेश यावेळी सरनाईक यांनी दिले.
तसेच भरारी पथकाद्वारे याची पाहणी केली जाईल. कामात अनियमतता आणि ढिलाई आढळल्यास तत्काळ नोटीस बजावली जाईल. असा सज्जड दम ही त्यांनी अधिकाऱ्यांना भरला. याचवेळी स्थानक परिसरातील स्वच्छता दुर्गंधी पाहून आगारप्रमुखांना फैलावर घेत, सचिवांना नोटीस काढण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची बोबडी वाळल्याचे बोलके चित्र यावेळी बसस्थानक परिसरात पाहायला मिळाले.
स्वच्छतागृहाची केली पाहणी…
स्वच्छतागृहाची पाहणी करताना प्रवाशांकडून पैसे घेता मात्र सुविधा देत नाही. पैसे घेण्याचे आदेश नसताना तुम्ही पैसे कसे काय घेता? आत्ताच्या आत्ता यांचा मक्ता रद्द करा. प्रवाशांना सुविधा द्या. अशा सूचना देत विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आदेश दिले.
प्रवाशांची संवाद साधत घेतला सेल्फी…
सोलापूर बसस्थानकावर असलेले कॅन्टीन प्रवाशांसाठी चांगले आहे का नाही? याची पाहणी परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली. कॅन्टींनच्या स्वयंपाक घरात जाऊन तेथील खाद्यपदार्थांची तपासणी केली. तसेच येथे सेवन करत असलेल्या खाद्यपदार्थांची प्रवाशांकडून माहिती घेतली. यावेळी काही प्रवाशांनी सेल्फी घेण्याची आग्रह केल्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी घेतला. तर बस स्थानकावर उभे असलेल्या प्रवाशांना सेवेस संदर्भात प्रश्न विचारत माहिती घेतली.
सोलापूर बस स्थानकाच्या गैरसोईबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने पाहणी दौऱ्यात संबंधितांना नोटीस…
सोलापूर बसस्थानकावर नेहमीच अस्वच्छता दुर्गंधी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतः तिसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर आलो आहे. तक्रारीच्या अनुषंगाने परिसराची पाहणी केली. सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्थळ देखील अस्वच्छ आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. येत्या आठ दिवसात सोलापूर बसस्थानकाचे रूप बदलले पाहिजे. तसा आठ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. भरारी पथकाद्वारे पाहणी करण्यात येईल. बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध होत नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे. त्यावर अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा डेली रिपोर्ट मागवला जाणार आहे. स्वच्छतेसंबंधी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य
महायुतीमध्ये सर्वकाही व्यवस्थित…
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, महायुतीमध्ये सर्वकाही व्यवस्थित आहे. काही गोष्टींमध्ये मतभेद व मनभेद असतात. परंतु त्या वरिष्ठ स्तरावरून हातळल्या जातील. भविष्यामध्ये महायुतीमध्ये कोणताही मिठाचा खडा येणार नाही. सामंजस्याची भूमिका घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल असे देखील प्रताप सरनाईक यांनी महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर सोलापूर दौऱ्यात स्पष्टीकरण दिले.
बसस्थानक प्रमुखाची जबाबदारी मात्र ते आलेच नाहीत पुढे…
सोलापूर बसस्थानक अपडेट ठेवण्याची जबाबदारी बसस्थानक प्रमुख जाधव यांची आहे. परंतु जाधव या तपासणी दौऱ्यात अधिकाऱ्यांच्या मागे दिसून आले. वास्तविक पाहता स्थानक परिसरात घडणाऱ्या घडामोडींवर बसस्थानक प्रमुखांचे नियंत्रण असते. चालक, वाहक, प्रवासी तसेच घडणाऱ्या घडामोडी यासाठी स्थानक प्रमुख जबाबदार असतो. परंतु मंत्र्यांच्या दौऱ्यात आगारप्रमुखांना हे प्रकरण चांगलेच शेकले आहे. तर दुसरीकडे बसस्थानक प्रमुख जाधव सेफ झाल्याचे दिसून आले. मात्र यावर स्थानिक पातळीवर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व इतर अधिकारी काय ॲक्शन घेणार याकडे मात्र एसटीतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
फोटो ओळ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर बसस्थानक पाहणी दौऱ्यावर आल्यानंतर स्वच्छता आणि दुर्गंधी पाहून प्रत्येक विभागाची कसून तपासणी आणि चौकशी करताना अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.



















