पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात कासेगाव येथील फळावरील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंढरपूर तालुक्यात पंढरपूरसह भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळूज, चळे, तुंगत व कासेगाव या सर्वच महसुली मंडलांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. पाऊस पडत असतानाच जोराचे वादळ आल्यामुळे काही भागात फळावरील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या. यात सर्वाधिक फटका कासेगाव येथील शेतकऱ्यांना बसला.कासेगाव हे द्राक्षबागांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे सुमारे दोन ते अडीच हजार एकर क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या आहेत. येथील द्राक्ष हंगाम सध्या सुरू आहे. द्राक्ष उतरविण्याची कामे सुरू आहेत. द्राक्ष बागांवर माल असतानाच येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात वादळ आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या. जमीनदोस्त झालेल्या द्राक्षबागा उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत.