दक्षिण सोलापूर – मंद्रूप परिसरातील ३८ गावांमधील शेतकरी व नागरीक यांची कामे जलद गतीने व सुलभ होण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय मंजूर केला आहे. मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय सुरू होऊन पाच वर्षे झाले तरी या ठिकाणी नागरिकांची कामे करताना कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कामचुकार व टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ जडमोटे यांनी केली आहे .
मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयातून शेतीरस्ते , जमीन वाटप, जन्म मृत्यू नोंद , विविध प्रकारचे विद्यार्थी दाखले यासह अनेक कामे करण्यात येतात. यासाठी लाभार्थी व नागरिक विविध गावातून तहसील कार्यालयात येतात. कामाविषयी चौकशी केली असता कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येते. शिवाय अनेक कर्मचारी
नागरिकांबरोबर हुज्जत घालतानाही दिसून येतात .
याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतरही त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होताना दिसून येत नाही. तहसीलदारांकडून काम करण्याचे आदेश दिल्यानंतरही कर्मचार्यांकडून टाळाटाळ करून लाभार्थ्यांना वेटीस धरण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी व नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात आहे. मंद्रेप तहसील कार्यालयातून नागरीकांची कामे जलद गतीने होणायाऐवजी अडवणूक होताना दिसून येत आहे .
या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कामचुकार करणाऱ्या व नागरीकांना त्रास देणार्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष जोडमोटे यांनी केला आहे.























