मुंबई, ३१ जुलै (हिं.स.) : येथील यशश्री हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला मुंबईतील न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती.
नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताब्याची मागणी केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने दाऊदला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस दाऊदची चौकशी करणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानेच यशश्री शिंदेची हत्या केली आहे. त्याने हत्या का केली? त्याचे आणि यशश्री शिंदेचे काय संबंध होते? याबाबत पोलीस चौकशी करणार आहेत.
२५ जुलै रौजी उरणमध्ये राहणारी यशश्री बेपत्ता झाली होती. ती बेलापूरमध्ये एका कंपनीत काम करत होती. ती घरी परत न आल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी यशश्रीचा शोध सुरू केला होता. पोलिसांना यशश्रीचा मृतदेह रेल्वे स्टेशन जवळ आढळून आला. तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती.