पंढरपूर – श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दामोदर आश्रमात श्रीराधादामोदर प्रतिष्ठान व संतविद्या प्रबोधिनी तर्फे दिला जाणारा “श्रीदासगणू महाराज पुरस्कार” या वर्षी काशी येथील वेदशास्त्र संपन्न गणेश्वरशास्त्री द्राविड यांना प्रदान करण्यात आला. वेदाचे संरक्षण, संवर्धन यासंबंधीच्या शास्त्रीजींच्या कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व १.२५ लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याच कार्यक्रमात संस्कृत भाषा संवर्धन पुरस्कारहि प्रदान करण्यात आले. पुणे व लातूर या विभागातून संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो. शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह व १० सहस्र रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी कु.समृद्धी जाधव, कु.गौरवी ठुबे, कु.स्वप्नाली महाजन व कु.तनुजा चोपडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ‘अनंतप्रज्ञा गौरव पुरस्कार’ पंढरपूर येथील कु.तुलसी कबाडे हिला प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी श्रीराधादामोदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वि.वा.कल्याणीताई नामजोशी, श्री दासगणू महाराज प्रतिष्ठानचे सचिव विक्रम नांदेडकर, सुधीर शिरडकर तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


















