बार्शी – साहस, शौर्य व पराक्रम या गुणांचा विकास बाल व तरुणांमध्ये होणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर वीरांचे स्मरण करुन विविध समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन डॉ. राहुल पालके यांनी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात वीर बालदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, कला समन्वयक प्रा. बी. डी. पारसे, सार्वजनिक उत्सव समिती समन्वयक प्रा. एस. बी. शिंदे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पालके म्हणाले, भारतीय इतिहासात शीख धर्माचे महत्त्वाचे विशेष कार्य आहे. गुरुनानक यांनी शीख धर्माची स्थापना समाजात मानवता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने केली. गुरुग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ त्याची महती प्रस्थापित करतो. शीखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांच्या पुत्रांच्या बलिदानाचे स्मरण २६ डिसेंबर रोजी देशभरात केले जाते. त्यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह यांनी वयाच्या अवघ्या ९ व्या व ६ व्या वर्षी धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले. त्यांचा ध्येयवाद व निष्ठा वाखण्याजोगी आहे.२१ व्या शतकामध्ये या साहसाचे स्मरण करुन राष्ट्रसेवेसाठी व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे आहे. प्राचार्य शेख म्हणाले, सन २०२२ पासून देशभरात वीर बालदिवस साजरा होतो. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुघल सत्तेविरुद्ध लढताना गुरुगोविंद सिंह यांच्या पुत्रांनी केलेले समर्पण साहस, शौर्य व पराक्रमाचे प्रतीक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आदर्श जोपासत ध्येयपूर्तीसाठी सजग राहणे आवश्यक आहे. इतिहासातील घटनांचे अवलोकन करुन वर्तमानात वाटचाल करीत राहिल्यास भविष्य उज्जवल होवू शकते, असा आशावाद त्यांनी मांडला. या कार्यक्रमासाठी प्रा. अनिल कट्टे, प्रा. एस. एन. जाधव, डॉ. सदाशिव माने, संदिपान पिंगुरे, इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

























