सोलापूर : व्हि-एक्सल एज्युकेशन ट्रस्ट सोलापूर सेंटरच्या स्वमग्न विद्यार्थ्यांच्या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन सोलापूरचे अस्तिरोग तज्ञ डॉ. सत्यजीत वाघचवरे आणि दंतरोग तज्ञ डॉ. अभिजीत वाघचवरे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून उद्घाटन झाले. यावेळी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले आणि क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
कै. वि. मो. मेहता प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रुती बागेवाडी, संगमेश्वर कॉलेज मॅनेजमेंट कमिटी सदस्य तेजश्री काडादी, सोलापूर विकास मंचचे सदस्य कुंदन जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे श्री. बिराजदार सर यांच्या हस्ते समारोप आणि पारितोषिक वितरण करण्यात आले. विविध क्रीडा सामन्यात सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. डॉ. वाघचवरे यांनी स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
श्रुती बागेवाडी यांनी सेंटरच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि कै. वि. मो. मेहता प्रशालेच्या विद्यार्थ्यांसोबत स्वमग्न विद्यार्थ्यांची शाळेत भेटीसाठी येणार आहे असे म्हणाले. स्वमग्न विद्यार्थ्यांनी धावणे, लिंबू चमचा, थ्रो बॉल, सायकलिंग, अडथळ्यांची शर्यत, सॅक रेस अश्या विविध स्पर्धांमधून यश संपादन केले. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र तसेच युनिटला स्मृतिचिन्ह देण्यात आले. सेंटरच्या प्रमुख सौ. सुनीता वैद्य यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सुनीता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटरच्या सर्व शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

















