नवी दिल्ली – केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्यासह मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज संसद भवनात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींना कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांची आणि धोरणात्मक सुधारणांची माहिती देण्यात आली.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगारांसाठी चांगल्या कामाच्या परिस्थिती सुनिश्चित करणे, कामगारांचे जीवनमान सुधारणे, रोजगारक्षमता वाढवणे, सामाजिक सुरक्षा मजबूत करणे, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि सुसंवादी औद्योगिक संबंधांना चालना देणे, यासारख्या व्यापक उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. मंत्रालयाने ई-श्रम पोर्टल, श्रम सुविधा पोर्टल, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आणि राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल यासारख्या प्रमुख सुधारणा उपक्रमांवरही प्रकाश टाकला.
कामगार कायदे सुलभ करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांबद्दल आणि विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. कामगारांचे कल्याण उंचावण्यासाठी आणि समावेशक आर्थिक विकासाकडे भारताचा प्रवास पुढे नेण्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेचे त्यांनी कौतुक केले.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचीही उपराष्ट्रपतींना माहिती देण्यात आली. मंत्रालयाचे प्रयत्न, तरुणांमधील क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर, त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेण्यावर आणि “जन भागिदारी से जन आंदोलन” या कल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या सहभागी कार्यक्रमांद्वारे सामुदायिक सेवेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित आहेत, असे यावेळी उपराष्ट्रपतींना सांगण्यात आले.
उपराष्ट्रपतींना राष्ट्रीय युवा धोरण, ‘मेरा युवा भारत’ (माय भारत), राष्ट्रीय सेवा योजना, युवा वसतिगृहे आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार यासारख्या प्रमुख युवा-केंद्रित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.
उपराष्ट्रपतींना खेलो इंडिया, ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम’ योजना (टॉप्स), राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य, खेलो भारत नीती आणि ‘वन कॉर्पोरेट वन स्पोर्ट’ – सीएसआर मॉडेल यासह मंत्रालयाच्या क्रीडा विकास उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यांनी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकसह आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या – विशेषतः महिला खेळाडूंच्या – उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले.
ऑलिंपिकसह प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भारतात आयोजित करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना, उपराष्ट्रपतींनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे क्रीडा विकासाला लक्षणीय चालना मिळेल आणि जागतिक स्तरावरील उदयोन्मुख क्रीडा राष्ट्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल.