तभा फ्लॅश न्यूज/ जमीर काझी : वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पावसाळी अधिवेशनावेळी विधान परिषदेत ते मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस आ. अजित पवार यांनी हा व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सर्वस्तरातून त्यावर टिकेची झोड उठली आहे.
दरम्यान, कृषिमंत्री कोकाटे यांनी या कृत्याचा इन्कार केला असून मी रमी खेळत नव्हतो तर तो गेम स्किप करीत होतो, असा खुलासा केला आहे.
रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला असून ते मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसते पवार यांनी 18 सेकंदाचा हा व्हिडीओ पोस्ट करून त्यात म्हटले आहे,’ जंगली रमी पे आओ ना महाराज!, सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाही. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत.
त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत आहेत,अशी टीका केली आहे.
काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होऊन त्याबाबत सोशल मीडियावरून टीकेची झोड उठली आहे. राजकीय क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले असून विरोधकांनी हल्ला चढविला आहे.