सोलापूर – पद्मशाली चौक येथे असलेल्या देसाई विडी कारखाना क्रमांक 5 आणि 11 मध्ये सकाळी सात वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत तर विद्युत वायरिंचे मोठे नुकसान झालेले आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, तेलंगी पाश्चापेठ येथील कालिका देवस्थान लगत असलेल्या देसाई विडी कारखान्यात विद्युत वायरी मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. शॉर्टसर्किटमुळे परिसरात उभ्या असलेल्या दोन दुचाकीला आग लागली आणि काही क्षणातच दोन दुचाकी जळून खाक झाल्या. या कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक कुटुंब वास्तव्यास आहे. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच त्यांना सुरक्षित स्थळी तातडीने स्थलांतर केले. कोणतीही जीवित हानी झाली नाही
अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी वेळीच दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच देसाई कारखान्याचे व्यवस्थापक पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या आगीत कारखान्याचे काही किरकोळ नुकसान झाले आहे. स्कूटरला आग लागल्यानंतर फटाक्यांसारखे आवाज येत होते अशी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली. या घटनेची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

























