सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर दरवर्षीप्रमाणे “दक्षता जनजागृती सप्ताह” साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा सप्ताह दि. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सोमवारी महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाची शपथ घेण्यात आली.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता व पारदर्शक प्रशासनाची शपथ घेतली. शासन प्रशासनामध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पारदर्शकता या मूल्यांचा प्रसार करणे व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हा या आठवड्याचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलाणी, सहाय्यक नगररचना संचालक मनीष भीष्णूरकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगरअभियंता सारिका आकुलवार यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यात प्रामाणिकता आणि दक्षता ठेवा
या कार्यक्रमात आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनातील प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव व पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, नागरिकांचा विश्वास जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यात प्रामाणिकता आणि दक्षता ठेवणे आवश्यक आहे.

















