माळशिरस : श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था संचलित विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूल, माळशिरस येथे विद्यार्थ्यांसाठी ‘अंगत-पंगत’ हा नाईट कॅम्प सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व मारुती स्तोत्र पठणाने करण्यात आली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे, ग्रामीण जीवनाशी संबंधित अनुभवांची माहिती मिळवून देणे तसेच निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद मिळवून देणे हा होता. विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आत्मविश्वासाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य इनामदार मॅडम, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाबद्दल श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ॲड.. माधव मिरासदार, कार्याध्यक्ष ॲड. श्री. मिलिंद कुलकर्णी, कार्यवाह . राम दोशी, सहकार्यवाह
. राजाराम ढाले तसेच संचालक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेचे कौतुक केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, स्वयंशिस्त व संस्कारांची जडणघडण होण्यास मदत झाली असून सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

























