माढा : आर्या कृषी महाविद्यालय, मानेगाव ता. माढा येथील द्वितीय वर्षातील २९ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कोकण व महाबळेश्वर परिसरातील विविध संशोधन केंद्रांना भेट देऊन दि १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान यशस्वीपणे पार पडली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन प्रक्रिया आणि कृषी-आधारित उद्योग यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर येथील गहू संशोधन केंद्रास भेट देऊन गव्हाचे विविध वाण, सुधारित तंत्रज्ञान, बियाणे उत्पादन प्रक्रिया तसेच हवामानाशी जुळवून घेतलेले संशोधन याबद्दल मार्गदर्शन घेतले. त्यानंतर मधुमक्षिका पालन संशोधन केंद्रात मधमाश्यांचे प्रकार, मध संकलन, परागीभवनाचे कृषीतील महत्त्व आणि उद्योगातील संधी याची सखोल माहिती मिळाली. दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी विविध विभागांचा अभ्यास करून सेंद्रिय शेती, फळबाग व्यवस्थापन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उपलब्ध संशोधन संधींचा परिचय घेतला. लाखी बाग प्रकल्पाविषयीही विस्तृत माहिती देण्यात आली.
रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना नारळ उत्पादन, जाती सुधारणा, रोप निर्मिती, खत व्यवस्थापन आणि कोकणातील हवामानानुसार योग्य कृषी पद्धती याबद्दल शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे कृषीविषयक ज्ञान अधिक समृद्ध झाले असून त्यांच्या प्रत्यक्ष आकलनात भर पडली. सहली मध्ये प्रा. तुषार नामदे, प्रा. साठे मॅडम आणि श्री. कुमार शिंदे सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे सहल अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरली. सदर सहलीच्या आयोजनासाठी महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन उबाळे यांचे सहकार्य लाभले.



















