पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत आसलेल्या पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा थाटच काहीसा न्ह्यारा आहे. कारण ज्या त्या ऋतुमाना प्रमाणे सावळ्या विठ्ठल आणि रखुमाईला वेगवेगळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. ऐवढेच नव्हे तर ऋतुमाना प्रमाणे त्यांच्या खानपानाची देखील व्यवस्था असून ज्या त्या ऋतुमानाला योग्य होईल असे पदार्थ नैवेद्या मध्ये त्यांना दाखविले जात असतात. त्यामुळे गरीबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाचा खरोखरच थाट खूप मोठा आहे.
सध्या थंडीचा मौसम सुरु झाल्यामुळे पहाटेच्या थंडीत विठुरायाला उबदार कपड्यांचा पोषाख करण्यात येत आहे. दोन हात करवती काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधून उबदार शाल पांघरण्यात येत आहे, तर रात्री शेजारती नंतर रझई पांघरण्यात येत आहे. त्या मुळे थंडीच्या उबदार वातावरणात राजस सुकुमार असलेल्या सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच लोभस असे भासत आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने थंडीची चाहूल थोडी उशिरानेच सुरू झाली. नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात थंडी पडायला सुरुवात झाली. सावळ्या विठोबा रखुमाईस प्रक्षाळपूजे पासून दररोज रात्री तसेच पहाटे उबदार कपड्यांचा पोषाख करण्यात येत आहे.
पहाटे च्या नित्यपूजा वेळीच देवाला दोन हात करवती काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधून उबदार शाल पांघरण्यात येत आहे, तर रात्री शेजारती नंतर रझई पांघरण्यात येत आहे. रुक्मिणी मातेला ही उबदार शाल पांघरण्यात येत आहे, हा पोशाख थंडी संपेपर्यंत राहणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र राऊत यांनी दिली.
——————————-

उन्हाळ्यात देखील पांढऱ्या रंगाचा पोशाख –
थंडी प्रमाणेच उन्हाळ्यात देखील विठुरायाचा पोशाख वेगळा असतो. पांढऱ्या शुभ्र रंगाचा संपुर्ण पोशाख उन्हाळ्यात त्यांना परिधान करण्यात येत असतो. खानपानाच्या बाबतीत देखील विठ्ठल रुखुमाईची विशेष काळजी घेतली जाते. ज्या त्या ऋतुमाना प्रमाणे योग्य त्या पदार्थाचा समावेश असलेला नैवेद्य त्यांना दाखविण्यात येत असतो. विठ्ठलास उन्हाळ्याचा त्रास जाणवु नये त्याला शितलता मिळावी म्हणून दररोज दुपारी चंदनउटी नंतर लिंबुसरबत तसेच शिरा किंवा पोह्यांचा नैवेद्य दाखविण्यात येत असतो. काही वेळेस कैरीचे पन्हे आणि डाळीचा देखील नैवेद्य दाखविला जातो. या बरोबरच ऋतुमाना प्रमाणे उन्हाळ्यात अंब्याचा रस, बासुंदी, श्रीखंड आदी वेगवेगळ्या पदार्थांची नैवेद्या मध्ये रेलचेल असते.
—————————————————-
पंढरपूर : सध्या थंडीची चाहूल लागताच सावळ्या विठोबा रखुमाईस शाल, रझई व कानपट्टीचा पोशाख करण्यात येत आहे.



















