सोलापूर – भारत हा लोकशाही समृद्ध देश आहे. ही लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदान हे केवळ हक्क नसून लोकशाही जपण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पी.एम.-उषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय ‘मतदार जनजागृती व्याख्यान’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लोकशाही बळकट करण्यासाठी सुजाण, जागरूक आणि जबाबदार मतदार घडविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय लोकशाहीची मूल्ये, मतदानाचा हक्क व कर्तव्य, तरुणांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व यावर सखोल विचार मांडले. मतदान हे केवळ हक्क नसून लोकशाही जपण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजीवकुमार मेंते (संचालक, संगणकशास्त्र संकुल) होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांची नितांत गरज असल्याचे नमूद केले. या प्रसंगी व्यासपीठावर भाषा व वांग्मय संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले. कार्यक्रमात मतदान प्रक्रियेबाबत असलेले गैरसमज, मतदार नोंदणीचे महत्त्व, तसेच लोकशाहीतील युवकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ‘माझे मत – माझा अधिकार’ या संदेशाला अधोरेखित करण्यात आले.
















