तभा फ्लॅश न्यूज : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारणा धरणातून प्रतिसेकंद ३०,६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संभाव्य पूरस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन दलाला पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाहतुकीवर परिणाम
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर – गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दस्तुरी चौक, कळे येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठविण्यात येत आहेत.
कोल्हापूर – राजापूर राज्य मार्गावर बाजारभोगाव येथे पाणी आल्यामुळे मार्ग बंद करण्यात आला असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, बाजारभोगाव – पोहाळे रस्त्यावरही पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अनुस्कुरा घाट वाहतुकीस बंद
आज सकाळी अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम तातडीने सुरू केले असून, आज दुपारपर्यंत घाट मार्ग सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
प्रशासनाची पाळत
पूरस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथके, महसूल विभाग, पोलीस दल व ग्रामपंचायत कर्मचारी सतत पाळत ठेवून आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे.


























