वसमत / हिंगोली : नगर परिषद निवडणुकीत एक ऐतिहासिक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत सासू सुनिता मनमोहन बाहिती नगराध्यक्ष साठी २०,१६५ मते घेऊन ३४५१ मतांनी निवडून आल्या असून सून उत्कर्षा कन्हैया बाहिती यांनी २२०४ मते घेऊन नगरसेवका म्हणून १७८० मतांनी प्रभाग क्रमांक १२ मधून विजयी झाली आहे. वसमतच्या राजकीय इतिहासात प्रथमच असा अनोखा योग घडल्याने शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
घराच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्यानंतर आता या सासू-सून जोडीने थेट शहराच्या कारभाराची धुरा हाती घेतली आहे. प्रचारादरम्यान विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला.
ही निवडणूक केवळ नातेसंबंधांची नसून महिला नेतृत्वाच्या क्षमतेवर जनतेने दिलेला ठाम कौल मानला जात आहे. घर सांभाळताना दाखवलेली शिस्त, संयम आणि नियोजनशक्ती आता शहराच्या विकासासाठी उपयोगी पडेल, अशी अपेक्षा वसमतकर व्यक्त करत आहेत.
पहिले घर सांभाळले, आता शहर सांभाळू—या ब्रीदवाक्यासह वसमत नगर परिषदेत एक नवा अध्याय सुरू झाला असून आगामी काळात या नेतृत्वाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.


























