वसमत / हिंगोली – नगर परिषद निवडणूक २०२५ साठी आज संपूर्ण शहरात शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ७४.०७ टक्के मतदान झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे.
या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस फौजफाटा, अधिकारी व कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले होते. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवत सतत गस्त घालण्यात येत होती.

सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. पोलिस बंदोबस्तामुळे मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि मतदान प्रक्रिया निर्भय व सुरळीत पार पडली.
निवडणूक आयोग, प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या समन्वयामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेच्या वातावरणात पार पडलेली ही निवडणूक वसमतच्या लोकशाही परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली आहे.
आता सर्वांचे लक्ष मतमोजणी व निकालाकडे लागले असून वसमत नगर परिषदेत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे.


























