सोलापूर – महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीतील एकत्रित ताकद दाखवू. काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत भाजपाविरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेना उभाठा गटाचे माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शासकीय विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीची एकजूट आणि आगामी निवडणूक रणनीती स्पष्ट केली.
या सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पार्टीचा पराभव निश्चित असून सत्ता परिवर्तन घडवण्याचा आत्मविश्वास खैरे यांनी व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीत महाविकास आघाडी एका धाग्यात बांधून लढणार असून सोलापूरच्या विकासासाठी एकत्रित आवाज बुलंद केला जाणार आहे.
यावेळी काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























