तब्बल 11 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवलं आहे. या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि याच प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. या संपूर्ण निकालाचं हमीद दाभोळकरांकडून स्वागत करण्यात आलं आहे. कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.
माणसाला मारुन त्याचा विचार संपवता येत नाही. त्यामुळे आज नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतरही त्यांचं काम संपलेलं नाही. त्याचं काम चांगलं होतं म्हणून ते निर्धाराने सुरु आहे, हे यातून अधोरेखित होतं. ज्या विचारधारांकडे संशयाची सुई होती. त्यावर न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब झाला आहे, असंही हमीद दाभोलकर म्हणाले. दोन जणांना शिक्षा झाली ही समाधानाची बाब आहे. या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा झाली मात्र यामागील कटाचे सुत्रधार असलेल्यांना अटक झाली नाही. त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आता त्यांच्या विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही न्याय मागण्यासाठी जाणार असल्याचंही दाभोलकरांनी स्पष्ट केलं आहे.
मुक्ता दाभोलकर काय म्हणाल्या?
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, गौरी लकेश यांच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा 2018 साली पक़डला गेला. त्यावेळी 2018 साली आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पकडले गेले होते. त्यापूर्वी पाच वर्ष या हत्या प्रकरणाचा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. खरे मारेकरी असलेल्या दोघांना शिक्षा सुनावली आहे. 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो. ही भावना आमच्या सगळ्यांच्या मनात जागृक राहिली आहे आणि लोकशाहीसाठीदेखील उपकृत भावना असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली यासंदर्भात समाधानी आहोत. मात्र तिघांची निर्दोष मुक्तता झाली, त्याच्याविरोधाक कोर्टात जाणार असल्याचंदेखील मुक्ता दाभोलकरांनी म्हटलं आहे.
मास्टरमाईंडचा शोध घ्या; मुक्ता दाभोलकर
ही हत्या एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे, असं सीबीआयच्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे या कटामागे मोठा मास्टरमाईंट आहे. त्या मास्टरमाईंडचा शोध घेणं गरजेचं आहे. याचा शोध सीबीआयाने घ्यावा, असंदेखील त्या म्हणाल्या.