अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या एका विधानामुळे मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून घोषणांची वाट पाहणाऱ्या लोकांच्या पदरी निराशा आली आहे. लोकसभा (सार्वत्रिक) निवडणुकीच्या वर्षात केंद्र सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करते, ज्यामध्ये व्होट ऑन अकाउंट असते. म्हणजे सरकारला पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांच्या खर्चाच्या प्रस्तावाला संसदेची मंजुरी मिळते तर लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेले नवीन सरकार संबंधित आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करते.
केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प कसा असेल?
आगामी अंतरिम अर्थसंकल्पात सरकार कोणतीही मोठी घोषणा करणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले असून यासाठी जुलै २०२४ मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची वाट पाहावी लागेल, असेही त्यांनी म्हटले. CII ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरम २०२३ ला संबोधित करताना, अर्थमंत्री म्हणल्या की, ‘मला तुमच्या आशा मोडायच्या नाहीत, परंतु १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणारा अर्थसंकल्प केवळ वोट ऑन काउंट आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत सरकारचा खर्च भागवण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत. त्यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार.’
२०१९ अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा
नोकरदार वर्गाचे प्राप्तिकरातील सूटकडे नजारा खिळल्या असतील तर उद्योग आणि शेतकरी वर्ग सरकारकडून मदतीची आस लावून असेल. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यास अर्थमंत्र्यांनी नकार दिला पण, २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा केल्या होत्या. पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेची तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती.
केंद्राच्या या योजनेत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक ६,००० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय करदात्यांनाही मोठा दिलासा देण्यात आलेला. कर सवलतीसाठी मानक वजावट मर्यादा ४०,००० रुपयांवरून ५०,००० रुपये करण्यात आली होती. अशा परिस्थितीत २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून सलग तिसर्यांदा सरकार स्थापन करण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य असेल. त्यामुळे, मतदारांना विशेषतः मध्यमवर्गीय आणि करदात्यांना आकर्षित करण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या आकर्षक घोषणा केल्या जातील, याकडे लक्ष लागून असेल.