देगलूर / नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी हा नव्या राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. गेली अनेक वर्षे पक्षनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारीचे बक्षीस मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र उमेदवारीच्या वाटपात काही निष्ठावंतांना बाजूला ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. काही निष्ठावंतांनी पक्षांतर केले तर काही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येते.
मागील अनेक वर्षापासून हातात पक्षाचा झेंडा आणि डोक्यात पक्षाचा अजेंडा घेऊन प्रामाणिक काम करणाऱ्या निष्ठावंतांना आगामी निवडणुकीत उमेदवारीपासून डावलण्यात आल्याने तीव्र नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. आजपर्यंत या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी छतरंज्या उचलण्यापासून ते सभेत भाषण करण्यापर्यंत सर्व कामे केली आहेत. उमेदवारीचे बाशिंग बांधून निवडणुकीच्या भोवल्यावर बसण्याचा तयारीत असणाऱ्या निष्ठावंतांना काही पक्षाकडून डावलण्यात आले आहे. त्यामुळे काहींनी पक्षांतर करुन इतर पक्षाकडे आपली उमेदवारी निश्चित केली आहे तर काही पक्षांतराच्या मार्गावर आहेत. याचाच परिणाम म्हणून आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाला धक्का बसेल की त्या निष्ठावंताच्या जागी देण्यात आलेल्या नव्या चेहऱ्याला फटका बसेल हे आतातरी सांगणे अवघड आहे, पण निष्ठावंताच्या नाराजीचा सूर कोणालातरी नक्की भोवणार ? हे मात्र निश्चित!
यंदा मोठ्या प्रमाणात पक्षांतराचे सत्र चालूच आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढत असून, काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते स्वबळावर किंवा अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतांची विभागणी होऊन काही पक्षांचे गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेकडून होत असल्याने, प्रत्येक मताचे मोल अधिक वाढले आहे. नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीचा परिणाम थेट नगरसेवक आणि नगराध्यक्ष या दोन्ही निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना समजावून घेण्याचे मोठे आव्हान आता सर्वच पक्षांसमोर उभे टाकले आहे.
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप आणि इतर पक्षांनी आपल्या रणनीतींमध्ये बदल करण्यास सुरुवात केली असून, निष्ठावंतांच्या नाराजीचा फटका टाळण्यासाठी संपर्क मोहिमा गतीमान केल्या आहेत. मात्र, या नाराजीचा फटका शेवटी कोणत्या पक्षाला बसतो आणि कोणाचे राजकीय गणित कोसळते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.




















