सांगोला – तालुक्यातील पत्रकारांसाठी अधिस्वीकृतीधारक ओळखपत्र, मेडिक्लेम, पत्रकार भवन आणि गृहनिर्माण सोसायटी या पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मंगळवार दि.६ जानेवारी रोजी स्व.डॅा.गणपतरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी, सांगोला येथे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संवाद सत्र कार्यक्रमात ते बोलत होते. या संवादात सांगोला विधानसभा मतदारसंघातील भविष्यातील व्हिजन तसेच पत्रकारिता क्षेत्रातील विविध मुद्दे, आव्हाने आणि भविष्यकाळावर चर्चा करण्यात आली.
कॅन्सरचे प्रमाण व हृदयरोगाचे रुग्ण हे वाढत असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर द्यावा असा मौलिक सल्ला देत सांगोला तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सूतगिरणीचे मनुष्यबळ व प्रशासन व्यवस्थापक विजय वाघमोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एन.डी.बंडगर यांनी केले.
















