सोलापूर : बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे सकाळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी परिसरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. दिव्यांग अविनाश हुलसुरे या युवकाने कुणाचीही मदत न घेता स्वतःच्या अंगातील अदम्य इच्छाशक्ती व धैर्याच्या जोरावर पायऱ्या चढून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशास वंदन केले. दिव्यांग असूनही अढळ श्रद्धा आणि असामान्य धैर्याने बाबासाहेबांप्रती असलेला त्यांचा ‘भिमप्रेमाचा’ संदेश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.
शनिवारी सकाळी महापरिनिर्वाणदिनी मिलिंद नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी समोर तीन चाकी सायकलवरून एक दिव्यांग युवक खाली उतरला. ते कोणत्याही व्यक्तीची मदत, आधार किंवा कुबड्या न घेता स्वतःच्या जिद्दीने पहिल्या मजल्यावर चढले. अस्थिकलशाचे मनोभावे दर्शन घेऊन अभिवादन केले. पुन्हा कुणाच्या आधाराशिवाय पायऱ्यावरून खाली आले. त्यानंतर डॉ. आंबेडकरांचा पदस्पर्श लाभलेल्या ऐतिहासिक ‘पंचाची चावडी’ येथेही त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर आपल्या तीन चाकी सायकलवरून पुढील कामाला ते मार्गस्थ झाले. अविनाश हुलसुरे यांचा हा निष्ठा, त्याग आणि जिद्दीचा प्रवास पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. दिव्यांग असूनही अढळ श्रद्धा आणि असामान्य धैर्याने बाबासाहेबांप्रती असलेला त्यांचा ‘भिमप्रेमाचा’ संदेश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.
मागील ७–८ वर्षांपासून, १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला प्रेरणाभूमीत नियमितपणे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो. माझं जे काही आहे ते डॉ. बाबासाहेबांनीच दिलं आहे.दरवर्षी इथे नतमस्तक होऊनच माझा प्रवास सुरू होतो. यामुळे मला ऊर्जा आणि बळ मिळते. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे विचार हेच माझी खरी ताकद , शक्ती आणि प्रेरणा आहे, अशी कृतज्ञतापूर्वक भावना अविनाश हुलसुरे या युवकाने व्यक्त केली.























