सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे. येथील उद्योजक व व्यापारी यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी संघटना यांची लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधिन शेळकंदे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा परिषद नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, निवडणूक तहसीलदार अर्चना निकम, नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, प्रवीण घम, पी.आय. गड्डम, गणेश सूत्रावे, कमलेश शहा, बाळकृष्ण राजगिरी, चेतन बालना व सुरज राठी व अन्य उद्योजक व व्यापारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचा ही सहभाग घ्यावा. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उद्योजक व व्यापाऱ्यांकडे काम करणारा एक ही कामगार मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 135 ब नुसार मतदानाच्या दिवशी भर पगारी कामगारांना सुट्टी देण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाचे पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यापारी यांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान करण्याविषयी जागृत केले जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे 18 वर्षे वय पूर्ण झालेले आहे तसेच ज्यांनी आतापर्यंत मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही त्यांची नाव नोंदणी करून त्यांना मतदान कार्ड देण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून, या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे. असे जिल्हाधिकारी आशीर्वाद त्यांनी सांगून उद्योजक व व्यापाऱ्यांनीही त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करावे. कामगारांनी मतदान केल्यावर त्याच्या बोटावरील मतदान केल्याची शाई पाहून त्या कामगारांचा आस्थापनाच्या वतीने सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करावे. तसेच ज्या कामगारांचे मतदान कार्ड नाही त्यांची मतदार म्हणून नोंदणी करून त्यांना मतदान कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
उद्योजक सुरेश राठी यांनी मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली. त्यांच्याकडील सर्व कामगारांकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रतिज्ञा घेतली असल्याचे सांगून जिल्ह्यातील 200 खाजगी ऑटो रिक्षावर मतदारांनी मतदान करण्याच्या आवाहनाचे बॅनर्स लावले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच उपस्थित उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सोलापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाला सर्वोतपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मतदान जागृतीबाबत जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती देऊन जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी संघटना यांच्याकडून निवडणूक प्रशासनाला अपेक्षित असलेल्या सहकार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.