सोलापूर : महापालिका कर्मचारी अधिकारी, सेवानिवृत्त सेवक व माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांच्या महागाई भत्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे.
कार्यरत रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन दरामध्ये ५० रुपये इतकी वाढ करण्यात आली तर बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या दरमहा मानधनामध्ये ५०० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. अर्जित रजेचे सर्वांचे सात कोटी रुपये मंजूर केले आहे.याबाबतचे परिपत्रक महापालिका
मुख्य लेखाअधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी काढले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी, सेवानिवृत्त सेवक व माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांना महागाई भत्याचा दर ४० टक्के वरून ४४ टक्के इतका करण्यात आला असून एकुण ४ टक्के वाढ करण्यात आली आहे.सध्या सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत रोजंदारी सेवकांचे दैनंदिन दरामध्ये ५० रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे.
सध्या सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत बालवाडी शिक्षिका व सेविका यांना अदा करण्यात येणाऱ्या दरमहाचे मानधनामध्ये ५०० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. या प्रमाणे सर्व खाते/विभाग प्रमुख यांनी माहे डिसेंबर-२०२५ पेड इन जानेवारी-२०२६ ची वेतन /निवृत्ती वेतन/कुटुंब वेतन/माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांचे बिले तयार करून अंतर्गत लेखापरिक्षक यांचेकडून तपासणी करून रक्कम अदायगी साठी सादर करावीत. अंतर्गत लेखापरिक्षक यांनी या बिलांची तपासणी करताना व्यवसाय कराची खात्री करण्यात यावी, असे महापालिका मुख्य लेखाअधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
महापालिका शिक्षकांच्या सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मंजूर
महापालिकेतील फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या सर्वांचे अर्जित रजेचे सात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महापालिका शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हफ्ता 50 लाख रुपयेही मंजूर केले आहेत, असे मुख्य लेखाअधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सांगितले.
























