पंढरपूर – तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य विजय शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य विनोद भरते व ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास हे होते.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. निशा रोकडे, ग्राहक पंचायतीचे तालुका सदस्य शहाजी जाधव, प्रकाश माळी, राम कलढोणे,दीपक शेंडगे इ. उपस्थित होते.
प्रारंभी ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी ग्राहक चळवळ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेच्या स्थापनेपासून, तसेच ग्राहक संरक्षण कायदा मंजुरी पर्यंतची सविस्तर माहिती दिली.
यावेळी विजय शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागात ग्राहक पंचायतीचे कार्य सुरू झाल्यामुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी ,प्रश्न, समस्या सोडविण्याकरिता कायम मदत होणार आहे.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. चांगल्या वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. ग्राहकांना अडचणी आल्यास काय करायचे असे प्रश्न नेहमी पडतात. त्यामुळे ग्राहक जागृती करण्यासाठी अशा कार्यक्रमात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे आवाहन विजय शिंदे यांनी केले.
ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य विनोद भरते म्हणाले की, बाजारपेठेत गेले की आपण ग्राहक होतो. ग्राहक झालो की सेवा आणि मालाची खरेदी करतो. अशा सर्व ठिकाणी आपण ग्राहक होतो.ज्यावेळी आपली फसवणूक होते. त्यावेळी ग्राहकांना कुठे तक्रार करायची हेच समजत नाही. त्यासाठी ग्राहक पंचायत अशा कार्यक्रमातून प्रबोधन करते. असे प्रश्न ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सोडवले जातात.त्याकरिता ग्राहकांनी आपले प्रथम कर्तव्य म्हणून पावती घेणे फार गरजेचे आहे. तरच हा प्रश्न तात्काळ सोडवला जातो असेही विनोद भरते यांनी सांगितले.
सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सदस्य शशिकांत देशपांडे यांनी मानले. यावेळी आशा वर्कर्स, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























