सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस विविध उपक्रमांच्या आयोजनाने संपन्न झाला.
जागतिक मृदा दिनाच्या औपचारिक कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन नान्नज कार्यालय या मार्फत शेतकऱ्यांसाठी AI आधारित नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या महाविस्तार ॲप बाबत सखोल व सविस्तर माहिती देण्यात आली. याकरिता प्रमुख अतिथी म्हणून इंगळे सी. जी. , उप कृषी अधिकारी नान्नज आणि श्री. अडसूळ एस. एस., मंडळ कृषी अधिकारी नान्नज हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले होते. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सागर महाजन हे उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी जागतिक मृदा दिनाची संकल्पना समजून सांगितली. यानंतर अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व बुके देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांना श्री. अडसूळ एस. एस. यांनी महाविस्तार ॲप चे प्रात्यक्षिक दिले. या दरम्यान त्यांनी महाविस्तार ॲपची वैशिष्ट्ये आणि कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना सांगितली.
श्री. इंगळे सी.जी. यांनी महाविस्तार ॲप हे विद्यार्थ्यांनी स्वतः च्या शेतीसाठी आणि कृषी विस्तार शिक्षणाचा भाग म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरणे अत्यावश्यक असून याद्वारे मिळणारी माहिती अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि सोप्या भाषेत उपलब्ध असल्याचे सांगितले. कृषी पदवीधर म्हणून सदर महाविस्तार ॲप अत्यंत सोयीचे असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सदरील महाविस्तार ॲपचा सर्वांनी कृषी शिक्षणाच्या अत्याधुनिक प्रणालींच्या देवाण-घेवाणसाठी उपयोग करावा असे आवाहन केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग नान्नज कार्यालय यांनी शेतकरी व कृषी पदवीधरांसाठी हाती घेतलेल्या या स्तुत्य मोहिमेचे त्यांनी विशेष आभार मानले. औपचारिक कार्यक्रमाचा शेवट प्रा. अजित कुरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
जागतिक मृदा दिना निमित्त लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय दरवर्षी शिवार फेरीचे आयोजन करते. या शिवार फेरीच्या औपचारिक उद्घाटन याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माती परीक्षण रथाचे पूजन नारळ वाढवून प्रमुख अतिथी श्री. अडसूळ एस. एस. या मार्फत करण्यात आले. प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी यावेळी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना शिवार फेरीच्या आयोजन बाबत मार्गदर्शन केले व यशस्वीतेसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
सदरील शिवार फेरी ही दिनांक ५,६,८ आणि ९ डिसेंबर रोजी संपन्न होणार असून यात महाविद्यालयाच्या पंचक्रोशीतील रानमसले, मोरवंची भागाईवाडी, दारफळ, नान्नज, शिरापूर, पाकणी, पडसाळी आणि कौठाळी इत्यादी गावांतील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर कृषी व कृषी संलग्नित विषयाचे मार्गदर्शन विषय विशेषतज्ञ आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी या मार्फत करण्यात येणार आहे. या शिवार फेरीचा सदरील गावातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.


























