पंढरपूर – श्री पुंडलिकराय आळंदी पालखी सोहळ्यासाठी पुंडलिकराय देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांनी सागवानी लाकडातून सुबक नक्षीकाम केलेला लाकडी रथ अर्पण केला आहे.
येथील समस्त महादेव कोळी समाज, श्री पुंडलिक व महादेव देवस्थान ट्रस्टच्या भक्त शिरोमणी पुंडलिक पालखी सोहळा पंढरपूर ते आळंदी- पंढरपूर हा कार्तिक शु॥ पौर्णिमेला ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधी सोहळ्याकरीता वैकुंठवासी ह.भ.प.धोडापंतदादा यांनी सुरु केलेल्या परंपरनेनुसार ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर हे पालखी घेवून प्रस्थान करीत असतात.
यावर्षी हा पालखी सोहळा महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांनी सागवानी लाकडातून सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी रथातून आळंदीकडे मार्गस्थ झाला.
दरम्यान या नूतन पालखी रथाचे पूजन विठ्ठल महाराजाचे सपूत्र ह.भ.प गगनराव महाराज पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे हस्ते श्री पुंडलिक मंदिर येथे करण्यात आले. या पालखी पूजन कार्यक्रमासाठी पालखी प्रमुख ह.भ.प.माधव महाराज शिवणीकर, कबीर महाराज, भागवत शिरवळकर, श्रीकांत महाराज ठाकूर, विवेकानंद गोसावी, ऋषीकेश शिवणीकर व समस्त वारकरी आदी उपस्थित होते.
ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष बाबातात्या अधटराव, उपाध्यक्ष अनिल अभंगराव, सचिव उमेश संगितराव, खजिनदार सतिश नेहतराव, विश्वस्त दत्तात्रय कांबळे यांनी सर्व महाराज मंडळीचे स्वागत केले कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त सुरेश परचंडे, महादेव परचंडे, नितिन अधटराव, मुंकुद नेहतराव व समस्त कोळी बांधव, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















