सोलापूर – जिल्ह्यातील नगरपालिकांचा निकाल हाती आल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शिवसेनेचे पाच नगराध्यक्ष निवडून आल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना शहर जिल्हा कार्यालय येथे एकमेकांना गुलाल लावत लाडू भरून जल्लोष करण्यात आला. येतो सिर्फ झाकी है महापालिका अभी बाकी है असा इशारा जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी बोलताना दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जे कामे केली, लाडकी बहिणी व लाडक्या भावांचा हा आशीर्वाद आहे. भारतीय जनता पार्टी 12 जागांवर लढत असताना त्यांना फक्त चार जागेवर समाधान मानाव लागलं. सांगोल्यात शहाजी पाटील यांना भाजपकडून प्रचंड त्रास देण्यात आला होता, तरी देखील ते खचून न जाता बापूंनी त्यांची ताकत दाखवून दिली. सिद्धाराम म्हेत्रें यांनी एक हाती सत्ता राखून ठेवलेली असून दुधनी मध्ये त्यांनी जोरदार यश मिळवले. मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा येथे भाजपला रोखत शिवसेनेने यश मिळवले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी दिली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, नवनाथ चव्हाण, मनीषा नलावडे, अश्विनी भोसले, सुनंदा साळुंखे, प्रकाश अवस्थी, मनोज शेजवाल, पूजा चव्हाण आदी उपस्थित होते.
ज्या संख्येत शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. यामधून सर्वांना एकनाथ शिंदे व शिवसेनेची ताकद दिसली असेल. येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. संपूर्ण ताकतीने आम्ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत.
– सचिन चव्हाण (शहर प्रमुख )


















