देगलूर / नांदेड : तालुक्यातील येरगी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता व जलसंधारणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत परिसर, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र व रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. हरित गाव उपक्रमांतर्गत लोकसहभागातून येरगी ग्रामस्थांच्या माध्यमातून वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.
चालुक्यकालीन नगरी असलेल्या येरगी येथे हरित गाव उपक्रमांतर्गत गावालगतच्या ओढ्याजवळ वनराई बंधारा ग्रामस्थांच्या श्रमदानातून उभारण्यात आला, अशी माहिती सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील यांनी दिली. तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे जलसंधारणाचा प्रभावी नमुना साकारला गेला.
वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ, उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण आणि पिकांना मदत होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य, बालिका पंचायत राज टीम, अंगणवाडी–आशा सेविका, बचत गट महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येरगी गावाने लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्श घालून दिला आहे.

























