तभा फ्लॅश न्यूज/कळंब : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा पॉईंट प्रवाशांसाठी धोक्याचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून याठिकाणी वाहने थांबवून, पंक्चर करून, तसेच गाड्यांच्या काचा फोडून प्रवाशांवर लुटीच्या घटना वाढल्या असून या मार्गावरून रात्री प्रवास करणं धोकादायक बनत चाललं आहे. या घटनांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
येरमाळा हे ठिकाण अमरावती–पंढरपूर आणि सोलापूर–धुळे या दोन प्रमुख महामार्गांच्या संगमावर असून, याठिकाणी येडेश्वरी देवीचं प्रसिद्ध शक्तीपीठ असल्याने भाविकांची सतत वर्दळ असते. या मार्गावरून कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील भाविक शिर्डीच्या दिशेने जात असतात. मात्र, याच प्रवाशांना आता लुटीचा फटका बसतोय.
लुटमार कशी केली जाते?
पारगाव वाशी ते येरमाळा आणि येरमाळा ते बार्शी दरम्यानच्या घाटात चोरटे रात्रीच्या वेळी जानूनबुजून टायर पंक्चर करतात किंवा गाड्यांची काच फोडून प्रवाशांची बॅग, मोबाईल, पैसे चोरतात. काही घटनांमध्ये चालक व प्रवाशांवर मारहाणही केली जाते.
पोलीस यंत्रणा सतर्क, पण पुरेशी नाही:
या वाढत्या घटनांमुळे येरमाळा पोलीस स्टेशनने काही संशयितांना ताब्यात घेतले असले तरी, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, नवीन लुटमार टोळी सक्रिय झाली असून ती अजूनही पकडलेली नाही.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण:
सततच्या लुटमारीच्या घटना आणि पोलिसांकडून पुरेशा गस्तीअभावी महामार्गावर रात्री प्रवास करताना प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाहनधारक आणि ट्रॅव्हल्स चालक रात्र प्रवास टाळण्याचा सल्ला देत आहेत.
मागणी काय?
-
महामार्गावर दिवसरात्र पोलीस गस्त वाढवावी
-
सीसीटीव्ही कॅमेरे बसवून लुटमारग्रस्त ठिकाणे सतत निरीक्षणात ठेवावीत
-
वाहनचालकांनी जागरूक राहून अनोळखी व्यक्ती किंवा संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी
सोलापूर–धुळे मार्गावरील हा महत्त्वाचा पॉईंट जर सुरक्षित नसेल, तर यात्रेकरू आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी तातडीने कठोर कारवाई करून लुटारूंना रोखणं गरजेचं आहे.