टेंभुर्णी – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर माढा तालुक्यात भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांकडून जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत भाजप माढा तालुका पश्चिम मंडलाध्यक्ष योगेश बोबडे यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. टेंभुर्णी येथील भाजप संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरिष्ठ नेतृत्वालाच इशारा देत “जुन्या कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होईल,” असे ठाम विधान केले.
राज्यभरात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू असून भाजप हा राज्यातील सर्वात प्रभावी पक्ष ठरत आहे. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, माढा तालुक्यात मात्र जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून अलीकडे पक्षात आलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना उघडपणे व्यक्त करण्यात आली.
पत्रकार परिषदेत बोलताना योगेश बोबडे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरील जुने कार्यकर्ते विश्वासात घ्यायला हवेत. “नव्या नेत्यांच्या दबावाखाली जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारले गेले, तर कार्यकर्त्यांना वेगळी भूमिका घ्यावी लागेल. याचा थेट फटका भाजपला बसेल,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीतसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे यांचे नाव न घेता, अलीकडे भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांकडून कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या अधिकृत पॅनलकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप बोबडे यांनी केला. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचल्याचे त्यांनी सांगितले.
आपण स्वतः अकोले पंचायत समिती गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत बोबडे यांनी त्याबाबत वरिष्ठांकडे अधिकृत मागणी केल्याचे स्पष्ट केले. तसेच माढा तालुक्यातील भाजपचे अनेक जुने पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, त्यांना सन्मानजनक व न्याय्य उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्यावर टीका करत बोबडे म्हणाले की, कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने भाजपला विश्वासात न घेता स्वतंत्र पॅनल उभा केला होता. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतंत्र लढत असल्यास भाजप त्यास विरोध करणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजप कुर्डूवाडी मंडलाध्यक्ष अविनाश गोरे यांनी सांगितले की, भाजप युतीसाठी तयार होता, मात्र युती न झाल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक माढा तालुक्यात भाजप स्वबळावर, कमळ निशाणावर लढवण्याची कार्यकर्त्यांची ठाम तयारी आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप माढा तालुका पूर्व मंडलाध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व बूथ सदस्य गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक तयारीत सक्रिय आहेत. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी मोडनिंब येथे माढा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली असून, त्या बैठकीतील निर्णय व ठराव पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.
ही पत्रकार परिषद भाजप माढा तालुका पश्चिम मंडलाध्यक्ष योगेश बोबडे, कुर्डूवाडी मंडलाध्यक्ष अविनाश गोरे, माढा तालुका पूर्व मंडलाध्यक्ष योगेश पाटील तसेच भाजपचे अनेक जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली.


















