तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : पत्नीसोबत सुरू असलेल्या सततच्या वादामुळे तसेच शहरातील एका दुकानदाराकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून तानाजी नानासाहेब भराडे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज आळणी येथे घडली. या घटनेने संपूर्ण धाराशिव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आत्महत्येपूर्वी तानाजी भराडे यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून तो समाजमाध्यमांवर अपलोड केला. या २९ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी आणि धाराशिव शहरातील एका दुकानदाराकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचा पाढा वाचला आहे. त्रास सहन न झाल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. व्हिडीओच्या शेवटी ते भावनिक होऊन रडताना देखील दिसत आहेत.
घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. तानाजी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पोलीस विभागाकडून याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, व्हिडीओ क्लिप तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. मानसिक त्रासासारख्या कारणांमुळे एखादा तरुण आयुष्य संपवतो, ही बाब अत्यंत गंभीर असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी समाजातून केली जात आहे.