सोलापूर – नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना ला शहर-जिल्ह्यात लक्षणीय यश मिळाल्यानंतर सोलापूरातील शिवसेना युवा नेते श्रीनिवास संगा यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत निवडणुकीतील यश, आगामी राजकीय दिशा आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा झाली. सोलापूरमधील बेरोजगार युवकांना आयटी पार्कसह विविध औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
टेक्स्टाईल हब म्हणून ओळख असलेल्या सोलापूरचे प्रभावी ब्रॅण्डिंग, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, तसेच औद्योगिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगती यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी श्रीनिवास संगा यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासासाठी राजकारण आड येणार नाही. सोलापूरचा विकास हाच आमचा दृष्टिकोन आहे, असे स्पष्ट करत आवश्यक निधी व सहकार्य देण्याची ग्वाही दिली. येणाऱ्या काळात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी जबाबदारीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
युवकांचे संघटन कौशल्य, आक्रमक नेतृत्वशैली आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे व्यक्तिमत्व म्हणून श्रीनिवास संगा यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे सोलापूरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विकासाच्या मुद्द्यावर ते सातत्याने आग्रही भूमिका घेत आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ठोस आणि प्रभावी कृती आराखडा राबवला जाईल, असा विश्वास या भेटीनंतर राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

























