दत्तात्रय तिपणे यांना युथ सोशल आयकॉन अवॉर्ड
बाऱ्हाळी ( प्रतिनिधी) दि. १७ कोल्हापूर येथील दैनिक रोखठोक समूहाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय तिपणे यांना युथ सोशल आयकॉन अवॉर्ड २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक रोखठोक समूह कोल्हापूरच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीयकामगिरी करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन सन्मान कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. त्या अनुषंगाने रविवार दि. १४ जुलै रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृह कोल्हापूर येथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय. आर. एस. अतिरिक्त आयुक्त, विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन, चेन्नईचे समीर वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिने अभिनेत्री क्रांती रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय तिपणे यांनी ग्रामीण भागात व्यापार करत गेली वीस वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, दळणवळण अशा विविध क्षेत्रातील समस्या अथवा परिसरातील व्यक्तींचे विविध विषयावरील समाज प्रबोधन करणारे विचार जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वृत्तपत्र क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन सनदी अधिकारी समिर वानखेडे , मराठी सिने अभिनेत्री क्रांती रेडकर, दै. रोखठोकचे संपादक सुरेश माडकर, कार्यकारी संपादक डाॅ. सुरेश राठोड यांच्या हस्ते युथ सोशल आयकॉन अवॉर्ड २०२४ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी यकृत दान करून पतीला जीवदान देणाऱ्या प्रा. बळवंतराव देशपांडे बाऱ्हाळीकर यांच्या सुविद्य पत्नि सौ. सुप्रिया देशपांडे यांना शाहू प्रेरणा २०२४ या पुरस्काराने तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांना कृषी भूषण २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दैनिक रोखठोकचे सहसंपादक बाळकृष्ण गिरी, प्रा. बळवंतराव देशपांडे बाऱ्हाळीकर, दैनिक रोखठोकचे मुखेड तालुका प्रतिनिधी प्रा. पांडव मुंगनाळे, रयत क्रांती संघटनेचे माजी युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे.