तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि. १२ आॅक्टोबर ..
राज्य शासनाने शून्य पट, एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला आहे . यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ३५ शाळांचा समावेश आहे. या निर्णयानंतर शैक्षणिक संघटना संतप्त झाल्या असून, शाळा बंद करण्याच्या निर्णयावर तीव्र विरोध होत आहे.
बंद करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये समाविष्ट करावे. तसेच, समावेश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महिन्याला सहाशे रुपये दराने वाहतूक भत्त्याची तरतूद करावी, अशी सूचना केली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर शैक्षणिक संघटनेने विरोध दर्शवला आहे.या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क धोक्यात येईल. बंद केलेल्या शाळांमुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी जास्त अंतर पार करावे लागेल. वाहतूक भत्ता असला तरी ती अपुरी सुविधा ठरेल. शासनाने बंद करावयाच्या शाळांचा यू-डायस क्रमांक सादर करण्यासह तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही दिले आहेत. परंतु शाळा बंद केल्यास, शिक्षकांची भरती, इमारतीची देखभाल, इतर प्रशासनिक जबाबदाऱ्यांची स्पष्ट सूचना दिली.
शिक्षण हक्क कायद्यात शाळा बंद करण्याची कोणतीही तरतूद नसताना तसेच प्रत्येक गावात, वाडी-वस्ती दुर्गम भागात शिक्षण पोहोचविण्याच्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या पूर्वापार चालत असलेल्या धोरणाच्या विसंगत आहे. ५ किंवा ५ पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा प्रामुख्याने वाडी- वस्ती- तांडे अशा दुर्गम भागात आहेत. जंगलव्याप्त भाग, ओढे-नद्या ओलांडून जाणे अशा भागातील गरीब आदिवासी, कष्टकरी वंचितांच्या त्यांच्या गावातच शिक्षणाची व्यवस्था कायम ठेवणे आवश्यक असताना अशा शाळा बंद करून तेथील बालकांचे प्रामुख्याने मुलींचे शिक्षण थांबणार आहे. गावातीत शाळा बंद करून वाहतूक व्यवस्था करण्याचा उपाय समर्थनीय नाही. त्यातून या गावातील मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती असून ते कायम शाळाबाह्य होतील.
येत्या काळात पुणे विभागीतील सोलापूर, पुणे ,कोल्हापूर ,सांगली, जिल्हा परिषद शाळा सुद्धा कमी पट संख्या मुळे शाळा बंद होणार अशी शक्यता आहे.
शून्य तसेच एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या तालुका निहाय शाळांची संख्या
तालुका शाळा पटसंख्या
अक्कलकोट ०५ २२
बार्शी ०१ ००
करमाळा ०६ २१
माढा ०५ १६
माळशिरस ०४ १२
मंगळवेढा ०४ १३
मोहोळ ०२ ०६
पंढरपूर ०३ ०७
सांगोला ०४ १०
उत्तर सोलापूर ०१ ०४
…,,
एकूण ….,३५ १११
जिल्ह्यातील ३५ शाळांचा समावेश
शून्य ते पाच पटसंख्या असणार्या जिल्ह्यातील ३५ शाळांचा समावेश आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील सर्वाधिक सहा शाळा आहेत, तर सर्वात कमी प्रत्येकी एक शाळा बार्शी आणि उत्तर तालुक्यात आहेत. दक्षिण तालुक्यात एकही शून्य ते पाच पटसंख्या असणार्या शाळा नाहीत.
एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. या प्रकाराने त्या शाळेत असणारे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून बाहेर फेकले जाणार आहेत . ज्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्या शाळा दूर असल्यामुळे त्या शाळेत पालक आपल्या पाल्यांना पाठविणार नाहीत. शाळा बंद करण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी संधी देण्याची गरज आहे.
भिमाशंकर बबलेश्वर , सरपंच, भंडारकवठे