ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याचा वाहनचालक सचिन वाघ (रा. देवळा, नाशिक) याने सप्टेंबर अखेरीस काही किलो एमडीच्या (मेफेड्रॉन) गोण्या गिरणा नदीत फेकल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत नदीत शोधमोहीम राबविल्यानंतर ड्रग्ज सापडले नाहीत. परंतु, पथकाने देवळा तालुक्यात जंगलात पुरलेले १२.५ किलो ड्रग्ज हस्तगत केले आहे.
ललित पाटील हा २७ ऑक्टोबरपर्यंत साकीनाका पोलिसांच्या कोठडीत असून, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार चालक सचिन वाघ याने एमडीची विल्हेवाट लावली. यासंदर्भात अंधेरी न्यायालयात पोलिसांनी सोमवारी (दि. २२) माहिती दिली. पोलिसांची तीन पथके मंगळवारी (दि. २३) मध्यरात्री नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात धडकली. गिरणा नदीपात्रात पोलिस व ‘स्कूबा डायव्हर्स’ला पाचारण करण्यात आले. त्यांनी सकाळी आठपर्यंत नदीत कसून शोध घेतला. त्यानंतर सचिनकडे पुन्हा चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने उर्वरित एमडी हे जंगलात पुरल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक व मुंबई पोलिसांनी जंगलात शोध घेत एमडी हस्तगत केले.
घटनास्थळावरून…
– मुंबईतील तीन पथके जिल्ह्यात तळ ठोकून
– दोन ‘स्कूबा ड्रायव्हर्स’ला पाचारण केले
– सुमारे ५० किलो एमडी नदीत फेकल्याचा संशय
– ‘वॉटर’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शोध
– अनेक गावांना नदीतून पाणीपुरवठा होत असल्याने खळबळ
– नदीत फेकलेले एमडी विरघळल्याचा दाट संशय
कोण आहे सचिन वाघ?
ललितने ससून रुग्णालयातून पलायन केल्यावर सचिन वाघ याच्या वाहनातून तो मार्गस्थ झाला. संशयित सचिन हा देवळा तालुक्यातील रहिवाशी आहे. मुंबई पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात ठाणे जिल्ह्यात एमडी हस्तगत केल्यावर लवकरच नाशिकपर्यंत ‘कनेक्शन’ पोहोचेल, असा सचिनला संशय होता. त्याने पाच किलो शिंदे गावातील कारखान्यात टाकले. उर्वरित एमडीच्या गोण्या गिरणा नदीत फेकल्या. तर काही किलो एमडी जंगलात पुरले, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली. नाशिक पोलिसदेखील गेल्या आठवड्यात देवळ्यात सचिनच्या मागावर होते. तत्पूर्वीच सचिन याला मुंबई पोलिसांनी अटक केल्याने नाशिक पोलिसांना हा साठा उघड करणे शक्य झाले नाही.
नाशिकच्या शिंदे गावातील कारखान्यात तयार झालेल्या एमडीचा काही साठा संशयित सचिन वाघ याने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिस चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार शोधमोहीम सुरू आहे. माल हस्तगत करून पथक पुढील तपास करीत आहे.