‘इसिस’च्या फरार ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. पुणे पोलिसांनी जुलैमध्ये कोथरूड परिसरात तीन दहशतवाद्यांना पकडले होते. त्यांना घराची झडती घेण्यासाठी घेऊन जाताना तिघांपैकी एकजण कोंढवा परिसरातून पसार झाला होता.महंमद शाहनवाझ शफीउझ्मा (वय ३०) असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. पुण्यातून पसार झाल्यानंतर तो दक्षिण दिल्लीतील जैतपूर परिसरात वास्तव्यास होता. याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने त्याला रात्री अटक केली. शाहनवाझ व्यवसायाने अभियंता आहे.
त्याच्या ताब्यातून केमिकल पावडर, बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला फरारी घोषित करून त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. पुणे पोलिसांनी १८ जुलैला पहाटे कोथरूड परिसरातून आरोपी महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३) आणि महंमद युनूस महंमद याकुल साकी (वय २४, दोघे रा. मिठानगर, कोंढवा.मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाझ शफीउझ्मा पसार झाला होता. कोथरूड पोलिसांनी २२ जुलैला या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला. सध्या या गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडून करण्यात येत आहे.