ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्टेशन परिसरात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पवित्र संविधानाची दिंडी काढण्यात आली. या दिंडीत संविधानावर प्रेम करणारे शेकडो जण उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक वेळा संविधानाचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. गेल्या पाच वर्षात घटनाबाह्य पद्धतीने कामकाज सुरू असून नियमबाह्य कारभार करून पक्ष चोरणे, पक्षाचे चिन्ह पळवणे तसेच न्यायालयाकडूनही आपल्या मर्जीप्रमाणे निकाल लावणे असे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते. मात्र हेच चित्र विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. त्यामूळे ही सर्व कृती संविधानाच्या विरोधात केलेली असल्याचे समोर आले आहे.
आजच्या संविधान दिंडीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती आणि प्रबोधन व्हावे तसेच भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू असल्याचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी सांगितले.
त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे,संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे धर्मराज पक्षाचे राजन राजे, महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा खोपकर, शहर प्रमुख ,उपशहर प्रमुख, व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये उपस्थित होते.