‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत युद्धग्रस्त इस्त्राइलमधून भारत सरकारने सुरू केलेल्या २१२ भारतीय परत आले आहेत. आज, शुक्रवार सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले.
इस्त्राइल आणि हमास यांंच्यात गेल्या शनिवारपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे इस्त्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून बचाव मोहीम हाती घेतली जात असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन अजय’ असे ठेवण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१२ भारतीय आपल्या मायदेशी आले आहेत. बेन गुरियन विमानतळावरून भारतीयांना घेऊन एअर इंडियाच्या ११४० या विमानाने भारताच्या दिशेने रात्री नऊ वाजता उड्डाण केले. या अंतर्गत इस्रायलमधून २१२ भारतीयांना शुक्रवारी सकाळी ५.५४ वाजता दिल्ली येथे आणण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे सरकारने म्हटले आहे.
इस्राइलमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय
अधिक माहितीनुसार, इस्राइलने गाझा पट्टीत हमासवरील हल्ले तीव्र केले आहे. दरम्यान, इस्राइलमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक जण आमच्या सुरक्षेची काळजीत होता, भारतीय नागरिकाची प्रतिक्रिया
या विमानातून भारतात आलेल्या एका भारतीय नागरिकाने सांगितले की, “इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, आम्हाला भारतातून आमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे फोन येऊ लागले होते. प्रत्येक जण आमच्या सुरक्षेची काळजीत होता. आम्हाला सुखरूप मायदेशी आणल्या बद्दल मी भारत सरकार आणि मंत्रालयाचे आभार मानतो.
प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध – राजीव चंद्रशेखर
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, “इस्राइलमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीयाला आम्ही सुरक्षित आणणार आहोत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहेत. ज्या भारतीयांना इस्राइलमधून परत यायचे आहे. त्यांनी इस्राइल येतील भारतीय दुतावासात नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. सध्या इस्राइलमध्ये २० भारतीय असल्याचे देखील ते म्हणाले.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आढावा बैठक घेतली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षित परतण्यावर भर देण्यात आला. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. इस्रायलमध्ये अडकलेले भारतीय लोक त्यांची आवश्यक माहिती दूतावासाला देऊन भारतात परतण्यासाठी नोंदणी करू शकतात.