सोलापूर: शब्दांना धार आणि संघर्षाला गती देत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे कै. प्रा. सुधाकर मानकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक व संघटनात्मक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोलापूर येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), रिटायर्ड युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (रुक्टास) आणि सोलापूर विद्यापीठ अशासकीय महाविद्यालय प्राचार्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
या शोकसभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कै. प्रा. मानकर यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वशिष्ठ गुरमे यांनी केले.
प्रा. डॉ. जैनुद्दीन मुल्ला यांनी ‘सुटा’ (SUTA) संघटनेच्या वतीने कै. प्रा. मानकर सरांच्या संघटनात्मक कौशल्याचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.यानंतर शिक्षण क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ प्राध्यापक आणि प्राचार्यांनी आपल्या भाषणातून कै. प्रा. सुधाकर मानकर यांच्या अथांग ज्ञानसाधनेची व त्यांच्या पवित्र कार्याची कीर्ती अखंड तेवत राहील, अशा शब्दांत आदरांजली वाहिली. यामध्ये प्रामुख्याने प्रा. एस. के. मठपती, प्राचार्य के. एम. जमादार, प्रा. अशोक साळुंखे, प्राचार्य डी. जी. साळुंखे, प्रा. डॉ. डी आर गायकवाड, प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल, प्राचार्य बी. पी. रोंगे, प्रा. सारिपुत्र तुपेरे, प्रा. मोरे, प्रा. डॉ. शिवानंद भांजे,प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, प्रा. वाले, ऍड. सलगर यानी शब्दरूपी श्रंद्धाजलि वाहिली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. एस. आर. राजगुरू यांनी उपस्थितांचे आभार मानले. या शोकसभेला सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कै. प्रा. मानकर यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 23