केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. यापूर्वी राज्यात 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. त्यात बदल करून आता 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तारखेत बदल करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती.
भारतीय परंपरेत देव उठणी एकदाशीला फार महत्त्व आहे. या दिवसापासूनच हिंदूंमध्ये लग्न आणि शुभविधी सुरू होतात. यावर्षी 23 नोव्हेंबर रोजी देव उठणी एकदाशी असून त्यादिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आहेत. हे लक्षात घेऊन तारखा बदलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान 5 राज्यांमध्ये मतदान होणार आहे. तर आगामी 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजस्थानमधील अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी 23 नोव्हेंबरबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता देशातील 5 राज्यांमधील निवडणूक वेळापत्रकानुसार मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबर, छत्तीसगड 7 आणि 17 नोव्हेंबर, राजस्थान 25 नोव्हेंबर, मिझोराम 7 नोव्हेंबर आणि तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर या सर्व राज्यांमधील निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होतील.
देशातील 5 राज्यात 16 कोटींहून अधिक मतदार असून 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात पीव्हीटीजी मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत. पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे. 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.