ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याच्याशी अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात होत असताना नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. शहरातील शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा हा वाहनचालक आहे. ललितच्या अपघातग्रस्त कारची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित वाहन चालकाने मध्यस्थी केल्याने चौकशी केल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ललित पानपाटील हा एमडी तस्करीत उतरण्यापूर्वी नाशिकमध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत होता. दोन राजकीय पक्षांमध्ये त्याने काम केले आहे. तर, जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत त्याने त्या काळात शिवसेनेत प्रवेश केला होता. या मुद्द्यावरून नाशिक शहर व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी ललितसोबतच्या संबंधांचे आरोप खोडून काढण्याचे प्रयत्न केले आहेत. राजकीय वर्तुळातही एकमेकांकडे बोट दर्शवून ललितचे राजकीय ‘हितसंबंध’ विशद करण्याचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत.
यादरम्यान, नाशिक शहर पोलिसांनी नाशिक शहरातील शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याच्या खासगी वाहनचालकाची चौकशी केली. सन २०१५ मध्ये ललितच्या सफारी कारचा अपघात झाला. ही कार सिडकोतल्या बडदेनगर येथील एका गॅरेजमध्ये तेव्हापासून पडून आहे. गॅरेज मालकाकडे चौकशी केल्यानंतर पोलिस एका वाहनचालकापर्यंत पोहोचले. हा वाहनचालक शिवसेना नेत्यासाठी काम करीत असल्याची माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
चौकशीत काय?
‘त्या काळात ललित हा पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडे वारंवार यायचा. तेव्हा त्याच्याशी ओळख होती. वाहनाचा अपघात झाल्यावर त्याने दुरुस्तीबाबत विचारले. तेव्हा गॅरेजमध्ये कार लावली. दुरुस्तीनंतर बिल तयार झाले. परंतु, ललित पुन्हा आलाच नाही’, अशी माहिती चालकाने पोलिसांना दिल्याचे समजते. तर, संबंधित गॅरेजचालक व वाहन चालकाने ललितला वेळोवेळी फोन केले. पण, ललितने फोन न उचलल्याने कार अद्याप भंगारात उभी असल्याचेही चौकशीत समोर आले. दरम्यान, या चौकशीनंतर पोलिस संबंधित शिवसेना नेत्यापर्यंतही पोहोचणार का, या प्रकरणातील राजकीय संबंध उघड होणार का, यासंदर्भात पोलिस दलातही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.