सोलापूर:सोलापूर-धुळे महामार्गावर कासेगाव शिवारात भरधाव मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात पाच म्हशींचा महामार्गावर तडफडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सदगुरु पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक देखील महामार्गाच्या बाजूला जाऊन पलटी झाला आहे. अपघात स्थळी पलटी झालेला मालट्रक आणि रस्त्यावरच पडलेले मुक्या प्राण्यांचे मृतदेह हे विदारक चित्र मन हेलावून टाकणारे होते.पाच म्हशींचा मालक असणारा शेतकऱ्याने घटनास्थळी धाव घेत म्हशींजवळ दुःख व्यक्त करत बसला होता.
म्हशींचा कळप रस्ता ओलांडून जात होता
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी तुळजापूरकडून सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर म्हशींचा कळप रस्ता ओलांडत होता.त्याच मार्गावरून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहतूक ट्रकची म्हशींच्या कळपाला जोरदार धडक लागली. ट्रकची धडक लागून जखमी झालेल्या ०५ म्हशींनी तडफडून जागीच प्राण सोडला. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक देखील पलटी झाला.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारात देखील अनेक शेतकरी हे दुधाचा व्यवसाय करतात.पाच म्हशींचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता ऐकताच लखन वानकर हे शेतकरी घटनास्थळी धावून आले.दुर्घटना कळताच आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेतली. पाचही म्हशी कासेगाव येथील लखन वानकर या दुग्ध व्यावसायिकाच्या होत्या, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघात स्थळाचा पंचनामा झाल्यावरच नुकसानीचा संभाव्य आकडा पुढे येईल, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.