शिवसेना नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलीय. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आलीय. ईडीने दिलेल्या माहितीनुसार 10. 20 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. ईडीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. परंतु, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मगणार असल्याचे अनिल परब यांनी या कारवाईनंतर म्हटले आहे.
ईडीने आज मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केल्याची माहिती दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.
दापोलीतील साई रिसॉर्टशी संबधीत प्रकरणी ईडीकडून अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली होती. शिवाय साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते.