उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांच्याविषयी समाजमाध्यमात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या नेत्याला पोलिसांनी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कार्यवाही केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. खेमचंद गरपल्लीवार असे या नेत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी येथील खेमचंद गरपल्लिवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण केले होते. या लिखाणाने भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी गरपल्लिवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.
यापूर्वीही गरपल्लिवार यांच्यावर गुन्हे दाखल होते. त्यामुळे गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी गरपल्लिवार यांच्यावर उपविभागिय पोलीस अधिकारी, उपविभाग मुल यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 ( 1 ) ( अ ) ( ब ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागिय अधिकारी गोंडपिपरी यांचेकडे पाठविला. या प्रस्तावावर उपविभागिय अधिकारी यांनी जिल्हयातून हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.
गोंडपिपरीच्या राजकारणात गरपल्लिवार यांचे नाव मोठे आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांची पत्नी अपक्ष निवडून आली आहे. त्यांनी काँग्रेसला समर्थन दिले होते. काही महिन्यांपूर्वी गरपल्लिवार आणि त्यांच्या पत्नीने भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायाला शासनाने परवानगी द्यावी, असं वक्तव्य काही काळापूर्वी केलं होतं. यावर गरपल्लिवार यांनी लिखाण केलं होतं. पोलिसांनी गरपल्लीवार यांची प्रेस नोट माध्यमाकडे पाठवली. या प्रेस नोटचे शीर्षक “अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा जिल्ह्यातून हद्दपार” असे आहे. वास्तविक यापूर्वीही गरपल्लीवार यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.