इस्रो ह्या देशाच्या प्रख्यात खगोल संस्थेने चंद्रयानाच्या यशस्वी अभियानानंतर आता आपला पुढचा टप्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. लगेच आदित्य-एल.१ हे अभियान सूर्याकडे पाठवायचे असून ते येत्या २ सप्टेंबर २०२३ ला प्रक्षेपित करण्याची शक्यता आहे. दरम्यान ह्या मोहिमेतून आपल्याला सूर्यातील पदार्थ, गुरुत्व ,तापमान त्यातून निघणारी किरणे,ज्वाळा,वायू इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासाचा देशाला वैज्ञानिक आणि हवामानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप फायदा होणार असल्याचे येथील ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हटले आहे.
आज अमेरिका, युरोप आणि जपान या देशांनीच सूर्य मोहिमा केल्या असून आता अशी सूर्य मोहीम करणारा भारत हा चौथा देश ठरेल. सदर मोहीमेत इस्रो सोबत आयुका-पुणे आणि भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा ह्यात सहभागी आहेत. या मोहिमेत ७ वैज्ञानिक उपकरणे असून ते घेऊन जायला आदित्य यानाला पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर ‘लँग्रेज पोइंट’ वर ‘हालो ओर्बिट’ मध्ये स्थिर केल्या जाईल. हे अंतर पार करायला आदित्यला ३ महिने किंवा १०९ दिवस लागेल असे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
पृथ्वीवर सूर्याचे वातावरणाचा, तापमानाचा आणि गुरुत्वाचा सतत परिणाम होत असतो. सौर ज्वाळा,सौर वाताचा पृथ्वीच्या वातावरणावर आणि हवामानावर, सजीव सृष्टीवर आणि इलेट्रीक, इलेक्ट्रोनिक्स उपकरणावर वाईट परिणाम होतो. जर सौर वादळांची आधीच माहिती मिळाली तर हे धोके कमी करता येईल, ह्याच सोबत सूर्याच्या जडण घडणीचा अभ्यास करण्यासाठी ही सौर मोहीम आखल्या गेली आहे असेही प्रा. सुरेश चोपणे यांनी नमूद केले.