पर्यावरण समस्येचे समाधान भारतीय संस्कृतीच्या मूलभूत तत्वांचे पालन करूनच शक्य आहे. आपले वेद, वेदांगे, शास्त्र, साहित्य, परंपरा,लोकगीते, कला मनोरंजन, लोकव्यवहार यात पर्यावरण संवर्धनाची बीजे आहेत असे प्रतिपादन पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबादच्या कुलपती इंदूमतीजी काटदरे यांनी केले. रा स्व संघ जनकल्याण समितीच्या वतीने आयोजित श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, पुरस्कारार्थी डॉ. क्षमाजी मेत्रे व अमूलचे प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान व कार्यान्वयन प्रमुख श्री मनोजभाई मुंधडाजी रा स्व संघ देवगिरी प्रांत संघचालक अनिलजी भालेराव, श्रीगुरुजी पुरस्कार स्वागत समिती अध्यक्ष श्रीमती रेखाजी राठी, रा. स्व. जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष डॉ रविंद्र साताळकर व संभाजीनगर जिल्हाध्यक्ष गोवर्धनजी अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या पृथ्वी, जल, वायू, आकाश व अग्नी या पंचतत्वांचा विचार करून त्या पूरक असा आपला व्यवहार मानवाने ठेवला तर पर्यावरण समस्या सोडवता येईल या सर्वप्रती प्रेम, कृतज्ञता, दोहन, रक्षण याचा अवलंब करण्याची गरज आहे. असे त्या म्हणाल्या. महिला सबलीकरण या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या स्त्री अबला कधी होती. भारतीय परिप्रेक्षात विचार केला संपूर्ण कुटुंब व्यवस्था ही स्रियांना केंद्रस्थानी ठेवून झाली आहे. स्त्री व पुरुष हे एकमेकाविना अपूर्ण आहेत. ते एकत्र आले तरच एकात्मता शक्य आहे असे प्रतिपादन त्यांनी केले
याप्रसंगी वेदमंत्राच्या जयघोषात,महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धरमशाला, हिमाचल प्रदेशच्या सामाजिक कार्यकर्ता, चिन्मय ऑर्गनायझेशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट या संस्थेच्या संस्थापक डॉ क्षमा मेत्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच पर्यावरण क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या अमूल ब्रँड असलेल्या खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि आणंद यांना प्रदान करण्यात आला. अमूलचे प्रतिनिधी श्री मनोजभाई मुंधडा यांनी तो स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रु. 1 लाख राशी, सन्मानपत्र, गौरव चिन्ह शाल व श्रीफळ हे आहे.
तसेच चिन्मय ऑर्गनायझेशनमधील विशेष कार्याबाबत श्री नरेंद्र पॉल यांचा सत्कार सीमाताई कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी डॉ क्षमा मेत्रे यांच्या महिला सबलीकरण कामासंदर्भात तर अमूलचे पर्यावरण विषयक कामाची माहिती असलेली ध्वनी चित्रफीत दाखविण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना डॉ क्षमा मेत्रे म्हणाल्या स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने आरोग्य या विषयापासून कामाला सुरुवात झाली. मात्र केवळ तेवढ्याने भागणार नाही तर ग्रामीन भागातील त्यांच्या सर्व समस्यांना हात घातला तरच बदल शक्य होईल यातून सर्वांगीण विकासाचे काम महिला मंडळींच्या स्थापणेतून सुरू झाले. ग्रामीण महिला पूजनीय असून त्या आपल्या धर्म संस्कृतीचे रक्षण व जपणूक निष्ठेने करतात. महिलांमध्ये मुलत: शक्तीचा वास आहे फक्त योग्य दिशा देण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या
तर अमूलचे प्रतिनिधी श्री मनोजभाई मुंधडा म्हणाले अमूलने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढवलेच परंतु त्याच बरोबर पर्यावरण रक्षणाचे कार्यही सभासदांच्या सहकार्याने केले आहे. 1 कोटी, वृक्षारोपण,जलपुनर्भरण, बायोगॅस, सौरऊर्जा मधुमक्षिकापालन प्रशिक्षण असे उपक्रम प्रभावीरित्या राबविले आहे.
ह भ प चैतन्य महाराज यांनी आपल्या आशीर्वचनपर उद्बोधन केले.
प्रारंभी रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पु. श्रीगुरुजी यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.
श्रीगुरूजी पुरस्कारनिमित्त तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ रविंद्र साताळकर यांनी केले त्यात त्यांनी जनकल्याण समितीच्या सेवा कार्याची माहिती दिली तर आभार प्रदर्शन रेखाताई राठी यांनी केले. वैयक्तिक गीत राहूल राठोड यांनी प्रस्तुत केले.
अधिवक्ता राघवेंद्र भारस्वाडकर यांच्या वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.